माजलगाव : तीन चिमुकल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी माजलगाव तालुक्यातील पुंगनी गावच्या पुलावर पहाटे बेवारस सोडून दिले. ही घटना रविवारी गावकऱ्यांच्या लक्षात आली. पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन अनाथ आश्रमात पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान आई-वडिलांच्या बेबनाव व ताटातुटीत तीन चिमुकल्यांची मोठी तारांबळ होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर जाधव यांचा माजलगाव तालुक्यातील पुंगनी येथील महिलेसोबत आंतरजातीय विवाह २०१३-१४ साली झाला होता. दरम्यानच्या काळात त्यांना आर्यन (वय ६ वर्षे) अनिकेत (४ वर्षे) व आराध्या (२ वर्ष) अशी तीन मुले झाली. उभयतांत काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची गावकऱ्यात चर्चा आहे. यामुळे मुलांचे वडील ज्ञानेश्वर मोठ्या शहरात वास्तवास गेले, तर आईने लेकरांना नातेवाईकाच्या हवाली सोडून गेली. दरम्यान काही दिवस नातेवाईकांनी मुलांना सांभाळले. परंतु, आईबाप तिकडं मजा करत आहेत. आम्ही ही ब्याद का सांभाळायची? अशा भावनेने नातेवाईकांनी या तीन चिमुकल्यांना त्यांच्या आईचे गाव असणाऱ्या माजलगाव तालुक्यातील पुंगनी गावच्या पुलावर सोडून दिले.
रविवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी माजलगाव पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन बीडच्या बाल आश्रम ग्रहात त्यांना पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. या कामी पोलीस कर्मचारी अॅटवाड, चव्हाण, कापले यांनी काम पाहिले. डॉक्टर कैलास काटवटे सरपंच आसाराम शिरसागर गोविंद शिंदे यांनी सदरील चिमुकल्यांना त्यांच्या अंगावर असल्याने तालखेड फाट्यावरील कपड्याच्या दुकानावर तिघांनाही कपडे घेतले, खाऊ घेतला, त्याचबरोबर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. पोलिसांनी त्या महिलेच्या माहेरी भावाला फोन केले असता भाऊ यांनी सांगितले की, २०१३-१४ झाली तिने आंतरजातीय विवाह केल्यापासून आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नसल्याचे सांगितले. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.