जालना : भाजप नेते रावसाहेब दानवे यांची एक कृती सद्या जोरदार चर्चेत आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठकीत आणि कार्यकर्ता मेळाव्यांमध्ये सहभागी झालेले दानवेंनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि नाराजीची भावना निर्माण झाली आहे, तर विरोधी पक्षांनी देखील यावर जोरदार टीका करण्याची संधी साधली आहे.
नेमकी घटना काय?
अर्जुन खोतकर यांच्या सहकायनि आयोजित एका कार्यक्रमावेळी रावसाहेब दानवे नेत्याचा सत्कार करत होते. यावेळी फोटो देखील काढण्यात येत होते. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे फोटो काढत असताना एक कार्यकर्ता फोटोमध्ये येण्याचा प्रयत्न करत असताना दानवेंनी थेट कार्यकर्त्याला लाथ मारली. यानंतर हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून सद्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विरोधकांची टीका..
यापूर्वीही दानवे शेतक-यांविषयी वादग्रस्त विधान केले होते. आता त्यांच्या या कृतीवर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. काही कार्यकर्त्यांनी या प्रसंगाबाबत नाराजी व्यक्त केली असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना या घटनेची दखल घेण्याची मागणी केली आहे. विरोधकांनी देखील या घटनेवरून जोरदार टीका केली आहे. भाजप नेत्यांच्या कृतीतूनच पक्षाच्या मानसिकतेचे दर्शन घडते. कार्यकर्त्यांना निस्वार्थीपणे काम करण्याचा सल्ला देणारे नेतेच जर अशा वागणुकीचा अवलंब करत असतील, तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी येणारच, अशी भावना काही कार्यकर्त्यांकडून ब्यक्त केली जात आहे.
रावसाहेब दानवे यांच्या कृतीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली असून कार्यकर्ते सुद्धा या कृतीवरून दानवेंवर नाराज असल्याचे दिसून येत आहे.