हिंगोली : भारतीय जनता पक्षात आणखी एक बंडखोरी झाल्याने महायुतीला जोरदार झटका बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे रामदास पाटील यांनी बंडखोरी करत हिंगोली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारीच जळगाव खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीचे भाजपचे नेते रामदास पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी अखेर बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रामदास पाटील सुमठाणकर यांनी अगदी सुरुवातीपासूनच हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांची उमेदवारी बदलावी आणि भाजपचा उमेदवार द्यावा, अशी लावून धरली होती. त्यानंतर त्यांनी गुरुवारी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे.
रामदास पाटील सुमठाणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर म्हटले की, आमचे मतदान हे 33 टक्के मतदान आहे. खूप विचारपूर्वक फॉर्म भरला आहे, आता माघार घेणार नाही. ही लढाई माझी राहिली नसून ती पूर्णपणे कार्यकर्त्यांचा हातात गेली आहे. मी माझा फॉर्म हा वैयक्तिक भरलाआहे, पक्षाची भूमिका मी सांगू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
पुढे बोलताना रामदास पाटील म्हणाले की, याला बंडखोरी म्हणत नाहीत. आम्ही निवडून येऊ शकतो अशी सर्व लोकसभा क्षेत्रातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांची भावना होती. खासदार हेमंत पाटलांबाबत व्यक्ती द्वेष नव्हता, पण ते निवडून येऊ शकत नाहीत, अशी आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती, असं भाजप नेते रामदास पाटील यांनी सांगितलं आहे.