छत्रपती संभाजीनगर: पोलीस पाटील हे गाव पातळीवरील शासकीय यंत्रणेचा भाग असून त्यांना कोणत्याही राजकारणात सहभागी होता नाही. त्यामुळे कोणत्याही पोलीस पाटलाने राजकीय पक्ष, उमेदवारांच्या प्रचारात, निवडणुकीच्या कामात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये. अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कायदा सुव्यवस्थेचा तसेच आचारसंहिता पालनाचा आढावा घेतला. त्यामध्ये आचारसंहितेच्या काळात प्रशासनाच्या प्रत्येक घटकाने चोख पद्धतीने कामगिरी बजावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. गाव पातळीवरील राजकारणात पोलीस पाटील हे अनेकवेळा रस घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत पोलीस पाटलांनी निःपक्षपातीपणे प्रशासनाचे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
शासनानेच गावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, गाव पातळीवरील माहिती पोलीस प्रशासनाला मिळावी, यासाठी पोलीस पाटलाची नियुक्ती केलेली आहे. त्यांना शासनाकडून मानधनही दिले जाते. असे असतानाही पोलीस पाटील गाव पातळीवरील राजकारणात जास्तच रस घेत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे अशा पोलीस पाटलांना जिल्हा प्रशासनाने कारवाईची तंबी दिली आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, पोलीस पाटलाने गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काम करावे. राजकीय प्रक्रियेत सहभाग आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.