बीड : मागील आठवड्यात जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात १ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मंगळवारी (दि.२१) आणखी एक पोलीस हवालदार पाच हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून ही कारवाई केली. त्यामुळे पोलीस दलात सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकाराची पुन्हा एकदा यानिमित्ताने भांडाफोड झाला आहे.
मारुती रघुनाथ केदार (वय ३५ रा.चकलंबा) असे ताब्यात घेतलेल्या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. जिजाऊ प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी हरिभाऊ खाडे यांनी केलेल्या लाचेच्या मागणीमुळे राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणात पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कारवाई करत निलंबन केले होते. मात्र आरोपी अद्याप फरार असल्याने याच्या चर्चा सुरु असताना आता चकलांबामध्ये पाच हजारांची लाच घेताना हवालदार पकडला आहे.
तक्रारदार व त्यांचे चुलते यांच्यात शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामुळे चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती, त्यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी हवालदार मारुती रघुनाथ केदार (वय-३५ रा. चकलांबा) याने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार लाच घेताना केदारला रंगेहाथ पडकले आहे. याप्रकरणी केदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद वाघ, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विजयमाला चव्हाण, अमोल धस, सिकंदर, युवराज हिवाळे, अंमलदार शिंदे यांनी केली.