छत्रपती संभाजीनगर: अवैध गर्भलिंग निदान चाचणीच्या प्रकरणात अटक नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीत २४ मे पर्यंत वाढ करण्याचे आदेश सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदीन यांनी दिले. या प्रकरणात आरोग्य अधिकारी डॉ. अमरज्योती शिंदे यांनी फिर्याद दिलेली आहे. आरोपी साक्षी थोरात (१९), सविता थोरात (४३), सदाशीव काकडे (२१), कृष्णा नाटकर (३४), धर्मराज नाटकर (३१), सतीश टेहरे (३२), डॉ. रोशन ढाकरे (३०), गोपाल कळांत्रे (२४), नारायण पंडित (२३) या आरोपींच्या कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने वरील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोलीस कोठडी दरम्यान आरोपी सतीश टेहरे याच्या कॉलवर साक्षी ही गर्भलिंग तपासणीसाठी चोरमारेवाडी (ता. भोकरदन जि.जालना) येथील बोगस डॉ. बालाजी तळेकर याच्याकडे गेल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तळेकरचा शोध घेतला असता तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला आहे. तर आरोपी डॉ. ढाकरे याने अनिता काळे हिचा गर्भपात करण्यासाठी रविदीप हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या गुरुमाऊली मेडीकल (भाग्यनगर ता. भोकरदन) येथे काम करणारा काकासाहेब खेकाळे (रा. पेजनापूर ता. भोकरदन) याच्याकडून क्लिअर किट नावाची गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्या खरेदी केल्याचे तपासात सांगितले. मात्र, खेकाळे देखील गुन्हा दाखल झाल्यापासून पसार आहे. दरम्यान, आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.