छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्रीपर्यंत कुटुंबीयांसोबत गप्पा मारून झोपी गेलेल्या पोलिस अंमलदाराने पहाटे गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ते दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) कार्यरत होते. १८ नोव्हेंबरला पहाटे सव्वातीन वाजता हर्सुलमधील घृष्णेश्वर कॉलनीत ही घटना उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
या प्रकरणी हर्सूल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास पांडुरंग मळेकर (४१) असे मृत पोलिसाचे नाव आहे. मळेकर हे २००४ मध्ये शहर पोलिस दलात भरती झाले होते. मागील ६ वर्षांपासून ते एटीएसमध्ये कार्यरत होते. एटीएस अधीक्षकांच्या कार्यालयात ते काम करायचे. मळेकर यांनी रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत कुटुंबीयांसोबत गप्पा मारल्या. बराचवेळ ते मोबाइलवर वेळ घालवत बसले होते. रात्रीच्या सुमारास घरातील सदस्य झोपण्यासाठी गेल्यानंतर तेही त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी अभ्यासासाठी उठली असता तिची वडिलांच्या खोलीत नजर गेली. तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तिने आरडाओरडा केल्यानंतर घरातील नातेवाईक जागे झाले. अनिल ताठे आणि दिलीप चंदनसे यांनी तातडीने मळेकर यांना घाटीत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
कैलास मळेकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्याची दोन्ही मुले अभ्यासात हुशार आहेत. मुलाला काही दिवसांपूर्वी खेळात चांगले पारितोषिक मिळाले होते. त्याचे त्यांना फार कौतूक होते. सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना मळेकर यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचा कोणालाही अंदाज येत नाही.