परभणी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या सभेत चोरीच्या अनेक घटना घडल्या. आता त्या ङटनेचा छडा पोलिसांनी लावला आहे. नागरिकांजवळील मोबाईल, रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सोनपेठ, गंगाखेड येथे केलेल्या कारवाईत पॉकेटमारांना पकडण्यात आले असून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींजवळून रोख रक्कम, मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
सुरेश दादाराव काळे, गणेश सखाराम काळे, अमर देविदास काळे, विशाल रमेश लोखंडे, शरद मुरलीधर काळे, अर्जुन अंकुश पवार, राजेभाऊ बन्सी पवार, राजु जगन्नाथ जाधव, राहुल रमेश जाधव यांना सोनपेठ येथील समेतून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून रोख १६ हजार ४५० आणि मोबाईल मिळून ४६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबधीतांना सोनपेठ पोलिसात हजर करण्यात आले आहे.
तर गंगाखेड येथील सभेत दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून ५ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पो. नि. वसंत चव्हाण, सपोनि. पांडूरंग भारती, पोउपनि. वाघमारे, पोलिस अंमलदार भदर्गे, परसोडे, सातपुते, दुधाटे, चाटे, गायकवाड, डूबे, चव्हाण, निलपत्रेवार, ढवळे, पौळ, ढगे, घुगे, केंद्रे यांच्या पथकाने केली.
सोनपेठ आणि गंगाखेड येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली होती. या सभे दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गस्त घालत होते. या पथकाला काही पॉकेटमार चोर सभेत आले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सभेत आलेल्या आंदोलकांसारखी वेशभूषा करत गुप्त पध्दतीने पाळत ठेवली. सभेतून काही पॉकेटमार चोरट्यांना ताब्यात घेतले.