जालना: शुक्रवारी ओबीसी समाजाचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मोठा मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रत्येक पक्षाचे मोठे ओबीसी नेते आले होते. माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या मेळाव्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. अखेर पंकजा मुंडे यांनी उपस्थित न राहण्यामागचं कारण सांगितलं. मेळाव्याला जाण्यासाठी माझ्या पक्षाने मला परवानगी दिली नाही असं मुंडे म्हणाल्या.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव सभेसाठी पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती होती. मुंडे यांच्या अनुपस्थितीनंतर त्यावरून चांगलीच राजकीय चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर याच विषयावर बोलताना पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षण बचाव सभेसाठी जायला माझ्या पक्षाने मला परवानगी दिली नाही, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच या सभेमध्ये मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं प्रमुख भाषण होणार होतं आणि ओबीसी आरक्षणावरची त्यांनी भूमिका मांडली असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.