परळी : राज्यात सद्या आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. अशातच आता बीड जिल्ह्यात लोकसभेला मोठा धक्का दिल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी गट पुढच्या तयारीला लागला आहे. परळी मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याचा प्रयत्न शरद पवार गट करत आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना या मतदारसंघात मोठे आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांना गंगाखेडचे आ. रत्नाकर गुट्टे यांचा जावई आव्हान देऊ शकतो. अशी चर्चा रंगू लागल्या आहेत.
राजाभाऊ शरद पवारांच्या भेटीला जाणार..
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड उद्या मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राजेभाऊ फड हे परळीतील आहेत. तसेच रासपाचे ते युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. अशातच त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होत असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजेभाऊ फड यांचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
तर परळी मतदारसंघात ताकदीने लढणार..
राजेभाऊ फड हे शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यावेळी परळी मतदारसंघातून हजार कार्यकर्ते सोबत असणारा आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता सध्या पक्ष प्रवेश होत आहे. जर शरद पवार यांनी उमेदवारी दिली तर परळी मतदारसंघात ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शरद पवार परळी मतदारसंघासाठी स्वतः मैदानात उतरले असल्याने येथे विधानसभेसाठी नोटही चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.