परभणी : परभणी जिल्ह्यातून एक अपघाताची घटना समोर येत आहे. भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना भारसावडा गावानजीक रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. प्रभाकर गवारे, असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. अपघातानंतर स्कार्पिओ कार देखील आगीत जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रभाकर गवारे हे सोनपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी सायंकाळी ते ड्युटी संपवून दुचाकीवरून मानवत येथील आपल्या घरी जात होते. दरम्यान, भारसवाडा जवळील पोखर्णी ते पाथरी रोडवर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव स्कार्पिओ गाडीने गवारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यात गवारे यांची दुचाकी लांबपर्यंत फरफटत गेली होती. यावेळी स्कार्पिओने देखील पेट घेतला. गाडीतील चालक आणि प्रवाशांनी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या गवारे यांच्यावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.