Parbhani Crime News : परभणी : क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीला विषारी द्रव पाजल्याची घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील नानलपेठ ठाण्याच्या हद्दीतील नेहरूनगर भागातून हा प्रकार समोर आला आहे. कामावर का गेला नाहीत याचा जाब विचारल्यामुळे नराधम पतीने हे टोकाचे पाऊल उचलले. नारायण पवार असे पतीचे नाव आहे.
परभणीतील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शीतल पवार यांनी पोलिसांना जबाब दिला. त्यांचे माहेर हादगाव तालुक्यातील मारलेगाव येथील आहे. सन 2012 मध्ये नेहरूनगर भागातील नारायण पवार यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.
पती नारायण पवार हे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरी असताना त्यांना शीतल पवार यांनी कामावर का गेला नाहीत, असे विचारले. त्यावेळी नारायण पवार यांनी भांडण करून शिवीगाळ केली. पुढे वाद एवढा वाढला की, नारायण पवार यांनी पत्नीस विषारी द्रव पाजले. आरडाओरड केल्याने सासू, नणंद आणि शेजाऱ्यांनी सोडवासोडव केली. शीतल पवार यांना चक्कर येवू लागली. त्यावर त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.