छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैठणमधील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेमधील तब्बल 50 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी बिस्किट वाटप करण्यात आले होते. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले. काही जणांना मळमळ, उलट्या होऊन सुमारे 50 हून अधिक विद्यार्थी तापाने फणफणल्याचं लक्षात आल्यावर या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काहींना सलाइन लावण्यात आले आहे. सर्व मुलांवर उपचार सुरु असून या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
५० हून अधिक विद्यार्थी बाधित, उपचार सुरु…
पैठणच्या केकत जळगावच्या जिल्हा परिषद शाळेत शनिवार असल्याने मुलांना बिस्कीट वाटप करण्यात आले होते. बिस्कीट खाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. पोटात दुखून मळमळ उलट्या सुरु झाल्या. ५० हून अधिक विद्यार्थ्यांना हा त्रास झाल्याचे आढळून आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाचोड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून बिस्कीटातूनच विषबाधा झाली असल्याचे उघड झाले. काही विद्यार्थ्यांना सलाईन लावण्यात आले असून काहींवर उपचार सुरु आहेत. जि.प शाळेत ही घटना घडल्याने पालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
बिस्कीटांची मुदत तपासली होती का?
जिल्हा परिषद शाळेतील बिस्किटांमुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आल्याने, विद्यार्थ्यांचे पालक खूप संतापले आहेत. शाळेत दिल्या जाणाऱ्या खाद्यामधून विषबाधा होण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना बिस्किट खायला देण्याआधी त्याची मुदत तपासली होती का? असा सवाल उपस्थित होत आहे.