बीड : बीडमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बीडच्या आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा मिळाली असल्याची घटना समोर आली आहे. सात पिढ्या समाजातून तिला बहिष्कृत करण्यात आले आहे. याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्यामुळे त्यांना तेव्हा अडीच लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. हा प्रकार २२ सप्टेंबर २०२४ रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला आहे. हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला होता.
मात्र अखेर ९ जणांविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतचा मुद्दा समोर आल्याने खळबळ उडाली आहे मालन शिवाजी फुलमाळी (३२ वर्षे) असं या पीडित महिलेचे नाव आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. त्यांची जात नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. सासऱ्याने प्रेमविवाह केल्यानंतर जात पंचायत बसविण्यात आली.
यामध्ये नरसू फुलमाळी यांना २ लााख ५० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात राहणारे शिवाजी पालवे यांच्यामार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे भरवण्यात आली होती.
या पंचायतीमध्ये मालन आपले पती शिवाजी आणि मुलांसह तिथे पोहचल्या होत्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे ८०० ते ९०० लोकं आगोदरच एकत्र आले होते. त्यादिवशी निर्णय झाला नसल्याने त्यांना २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायतीत बोलवले. सकाळी ११ पंचांसमारे त्यांना उभे केले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा असे त्यांना सांगण्यात आले. तुम्हीही दंड भरला नाही तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू अशा धमक्या देण्यात आल्या.
शेवटी मालन यांनी दंड भरू न शकल्याने पंचांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबाला ७ पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे मालन यांनी आष्टी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून आष्टी पोलिस ठाण्यात गंगाधर बाबु पालवे, उत्तम हनुमंत फुलमाळी, गंगा गंगाराम फुसमाळी, चिन्नु साहेबराव फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबुराव साहेबराव फुलमाळी, शेटीबा रामा काकडे, सयाजी सायबा फुलमाळी, गुलाब पालवे यांच्यासह इतर पंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला.