मुंबई: आज लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून मोठी घडामोड समोर येत आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अंबादास दानवे हे पुढील दोन- तीन दिवसांत मोठा निर्णय देखील घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दानवे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना थेट मातोश्रीवर बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न झाल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. योगायोग म्हणजे महाविकास आघाडीतील एक मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी केले.
संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आमदार अंबादास दानवे इच्छुक आहेत. यापूर्वी देखील त्यांनी तसे सांगितले आहे. महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे देखील जवळपास निश्चित आहे.
दरम्यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाकडून पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दानवे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. कारण स्वतः ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दानवे यांची नाराजीची दखल घेत त्यांना थेट मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. तसेच तुमची प्रचारासाठी संपूर्ण राज्यात गरज असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सोबतच संजय राऊत यांच्याकडून देखील दानवे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळत आहे.
आमदार संजय शिरसाट यांचे वक्तव्य…
एकीकडे अंबादास दानवे नाराज असल्याची माहिती समोर येत असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केले . “महाविकास आघाडीतील एक बडा नेता एक- दोन दिवसांत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याचे संजय शिरसाट यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
भविष्यात काय घडेल सांगता येणार नाही : दानवे
दरम्यान या सर्व चर्चेवर एका दैनिकाला प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. आपण तशी मागणी देखील पक्षाकडे केली आहे. याबबत अजून तरी कोणताही निर्णय झालेला नाही. मी एक निष्ठावंत शिवसैनिक असून, संघर्ष हा माझ्यासाठी नवीन नाही. त्यामुळे भविष्यात काय घडू शकते, हे आताच सांगता येणार नसल्याचे’ दानवे यांनी म्हटले आहे.