छत्रपती संभाजीनगर : राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच आता मराठवाड्याला देखील यंदा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जरी तात्पुरता मिटला असला तरी भविष्यात हा प्रश्न उद्भवू शकतो. याशिवाय मराठवाड्यात अवकाळी पावसाने गेल्या पंधरा दिवसांपुर्वी चांगलंच झोडपलं. मात्र, त्याचा फारसा परिणाम धरणाच्या पाणी पातळीवर झाला नाही.
पावसाचा खंड, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर पावसाने दडी मारल्यामुळे यंदा धरणाच्या जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. नगर- नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात ८.६० टीएमसी पाणी साठा सोडण्यात आला असून जायकवाडीच्या धरणात सद्यस्थितीत ४५.४३ इतका पाणीसाठा आहे.
मराठवाडा पाणी परिषदेने नोव्हेंबर महिन्यात जलआंदोलन उभारल्यानंतर नगर आणि नाशिकच्या धरणातून ८.६० टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. त्यामुळे मराठवाड्यातील ८८ हजार हेक्टर पिकांना त्याचा फटका बसला आहे. असं असताना मराठवाड्यातील काही धरणात अद्यापही पुरेसा जलसाठा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
आठ धरणातील पाणी पातळी ५० ते ६० टक्केच
विष्णुपूरी, पेनगंगा आणि सिध्देश्वर धरणाची पाणी पातळी पाहता इतर आठ धरणातील पाणी पातळी ५० ते ६० टक्क्यांच्या आतच आहे. तर माजलगाव धरणात केवळ ६.६७ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. तसेच सिना कोळेगाव हे धरण कित्येक दिवसांपासुन कोरडेठाक आहे. गेल्या वर्षी याच धरणामध्ये ७० ते १०० टक्के पाणीसाठा होता.
मराठवाड्यातील धरणांची स्थिती
जायकवाडी ४५.४३
निम्र दुधना २१.६१
येलदरी ५९.५०
सिध्देश्वर ९५.१५
माजलगाव ६.६७
मांजरा २३.११
पेनगंगा ७८.८२
मानार ६१.४४
निम्र तेरणा १५.५२
विष्णुपूरी १००