लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे. शनिवारी सकाळपासून नीट पेपरफुटी प्रकरणी विविध घटना घडामोडी घडत होत्या. पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे लातूरपर्यंत पोहोचल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी नांदेडच्या एटीएसच्या पथकाने शनिवारी रात्री लातूरमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर नोटीस देऊन त्या दोघांनाही सोडण्यात आलं. यातील एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, संजय जाधव हे शिक्षक फरार झाले आहेत. या प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
पेपरफुटीप्रकरणी लातूरमधील दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत वेगवान हालचाली झाल्या. शनिवारी एटीएसनं चौकशी करून सोडून दिलेल्या दोन शिक्षकांपैकी पठाण या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीसांकडून त्याचा शोध सुरु आहे.
संजय जाधव हे चाकूर तालुक्यातील बोथी येथील रहिवासी आहेत. ते सोलापूर जिल्ह्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तर जलील पठाण लातूरजवळील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघंही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवत होते. नांदेड एटीएसनं या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी रात्रभर कसून चौकशी केली. त्यानंतर रविवारी रात्री लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दोन्ही शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शहर पोलीस उपाधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांसमोर पठाण यांची चौकशी करण्यात आली. रात्री बारानंतर पोलिसांनी तपासासाठी विविध पथके तयार केल्याची माहिती आहे. याबाबत कोणतेही अपडेट देण्यास पोलीस तयार नाहीत. मात्र, पेपरफुटी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारपासून आतापर्यंत यात किती लोकांची चौकशी झाली? किती लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला? याबाबत स्पष्टता नाही. मात्र जाधव आणि पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याव्यतिरिक्त आणखी इतर दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.