धाराशिव : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचाराला जोर आला आहे. राजकीय नेते दवे प्रतिदावे करत आहेत. अशातच ‘ओमराजे मला तुमची गोष्ट आजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असे तुम्ही म्हणालात, मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. आता एक म्हातारा खांद्यावर बसून आलेला पहिला का? असेही पवार म्हणाले. परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, रणजित पाटील उपस्थित होते.
…आणि घटना वाचवायचं काम केलं
परांडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत निवडणूक लढवत आहेत. या लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. संविधान बदलण्यासाठी 400 पार ची घोषणा केली. मात्र तुम्ही लोकांनी निर्णय हाती घेतला. तुम्ही आम्ही एकत्र झालो आणि महाराष्ट्रातील 48 खासदरापैकी 31 खासदार तुम्ही निवडून दिले आणि घटना वाचवायचं काम तुम्ही केल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. ही विधानसभा तुमच्या विचाराच्या लोकांच्या हातात पाहिजे. सत्ता हातात आल्यावर लोकांचे प्रश्न सोडवता येतात असेही शरद पवार बोलले.
दुष्काळाला तोंड देणारा, रोजगार हमीच्या कामावर जाणारा तुमच्यासारखा शेतकरी ऊस उत्पादन करतोय. माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे, त्याच्या घरातील मुले उच्चशिक्षित झाली पाहिजेत. त्यासाठी आम्ही काम हातात घेतलं आहे. महाविकास आघाडीचे संघटन उभं केल आहे. महिलांना अधिकार दिले की महिला काहीही करू शकतात. महिलांना संधी देण्यासाठी महालक्ष्मी योजना काढल्याचे शरद पवार यांनी यावेळी म्हटले.
महाराष्ट्र गद्दरीच्या राजकारणाने पोखरला गेला: ओमराजे निंबाळकर
आपला महाराष्ट्र गद्दरीच्या राजकारणाने पोखरला गेला आहे असं विधान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलं. खोक्याच्या आमिषाने, ईडीच्या भीतीने अनेकांनी पक्षाची साथ सोडल्याचे शरद पवार म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या सभेत टेलीप्राँटर आम्ही पाहिलं. पण कालच्या सभेत लाईव्ह टेलीप्राँटर पाहिलं. मागून प्राँट करत होतं, असे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावला.