जालना : मंठा तालुक्यातील शिरपूर येथे गावापासून काही अंतरावर असलेल्या घरात एका वृध्द दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि.८) सकाळी उघडकीस आली. धोंडिबा कानुजी कोकाटे (वय ८०) व वत्सलाबाई धोंडिबा कोकाटे (वय ७४) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले, तरी मृतांच्या अंगावर मारहाणीच्या खुना आढळून आल्याने कुणीतरी कोकाटे दांपत्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी अज्ञात संशयितांविरुध्द मंठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी माहिती देताना मंठा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी सांगितले, की तळणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरपूर गावालगतच असलेल्या आदिवासी वस्तीत छोट्याशा पत्र्याच्या घरात मजुरी करणारे धोंडिबा कोकाटे हे आपल्या पत्नी वत्सलाबाई यांच्यासोबत राहत होते. त्यांचा मुलगा रामदास हा गावातील घरात राहतो. अधूनमधून तो आईवडिलांकडे जातो. दरम्यान, धोडिंबा कोकाटे यांचे घर तीन-चार दिवसांपासून बंद होते. शिवाय ते चार दिवसांपासून मुलाच्या घरी आले नव्हते. घरातून उग्र वास येत होता. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांच्या मुलास माहिती दिली.
मुलाने येऊन पाहिले असता, घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावलेले होते. त्यामुळे त्याने मंठा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निकाळजे, सहायक निरीक्षक कैलास भारती हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घराच्या पत्र्याचे शेड काढून आत पाहिले असता कोकाटे दांपत्याचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले. त्यांच्या डोक्यावर व गळ्यावर मारहाणीच्या जखमा होत्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मंठा आरोग्य केंद्रात पाठवले.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी रामदास धोडिबा कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुध्द मंठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक कैलास भारती अधिक तपास करत आहे.