जालना : सरकारकडून आम्ही आरक्षणाची आशा सोडली असून ते आम्हाला आरक्षण देत नाहीत आणि सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी देखील करत नाहीत. सरकारनं आतापर्यंतचे सर्व आणि सरसकट गुन्हे मागे घ्यावेत असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. अंतरवली सराटी येथून मनोज जरांगे बोलत होते. तसेच आमचे अनेक लोक विनाकारण गुंतवले आहेत, असं म्हणत सरसकट गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली आहे.
अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु होते. यावेळी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला होता. या आंदोलनात सहभागी असलेल्या मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. यामध्ये अनेक मराठा आंदोलकांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवल्याचा मनोज जरांगे यांनी आरोप केला होता. याआधी मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी उत्तरही सादर केले होते.
7 ऑगस्टपासून शांतता रॅलीला सुरुवात
मनोज जरांगे पाटील 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली काढणार आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात आठवडाभर दौरा करणार आहेत. सोलापूर पासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून नाशिकमध्ये समारोप होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
असा असेल मनोज जरांगेंचा दौरा
7 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे शांतता रॅली काढणार असून सोलापुरात मुक्कामी
8 ऑगस्ट रोजी सांगली
9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर
10 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा
11 ऑगस्ट रोजी पुणे
12 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर
13 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात या शांतता यात्रेचा समारोप होणार आहे.