लातूर : लातूर शहरात एक आठवड्यापूर्वी घडलेल्या एका हत्याकांडातील आरोपीच्या हैदराबादमध्ये मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. विवेकानंद चौकातून सिद्धार्थ सोसायटी मार्गे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्तालगत असलेल्या ताजोद्दीन बाबा दर्ग्यात एका कथित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या डॉनचा निर्घृण खुन झाला होता.
लातूर शहरात पूर्व भागात राहणाऱ्या कुख्यात दरोडेखोर आणि डॉन मुकड्या उर्फ सुजात अली सय्यद याच्या शरीरावर एका धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना आठवड्याभरापूर्वी ताजोद्दीन बाबा दर्ग्यात घडली होती. या डॉन मुकड्यावर 17 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल होते. पूर्व भागात मुकड्याची प्रचंड दहशत होती.
त्यामुळे या भागातील लोक देखील मुकड्याला घाबरुन तो मागेल तेवढे पैसे द्यायचे. मुकड्या या गोष्टींचा फायदा घेऊन कोणालाही त्रास द्यायचा. तसेच याच भागातील रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार सलीम उर्फ जालीम शेख याने मुकड्याचा काटा काढायचा प्लान केला. मुकड्या हा रात्री नशेत ताजोद्दीन बाबा दर्ग्यात झोपल्याचे पाहुन त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच ठार केले.
त्यानंतर जालीम शेख हा नांदेडमार्गे हैदराबादला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी समीर उर्फ जालीम शेख याला हैदराबाद येथून अटक करत बहुचर्चित मुकड्या डॉन खून प्रकारणाचा छडा लावला आहे. लातूर शहरातील विवेकानंद चौकातून सिद्धार्थ सोसायटी मार्गे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्तालगत असलेल्या ताजोद्दीन बाबा दर्ग्यात एका डॉनचा निर्घृण खुन झाल्याची घटना घडली होती.
या घटनेनंतर परिसरातील एकाने 112 वरुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्याबरोबरच तपास पथकातील श्वानांची देखील या तपासात मदत घेण्यात आली. तसेच फॉरेन्सिक लॅबची टिमसुद्धा घटनास्थळावर उपस्थित होती. सय्यद फारुक सुजातअली उर्फ मुकड्या (वय 37 वर्षे) असे खुन झालेल्याचे नाव असुन तो ताजोद्दीन बाबा मंदिर परिसरात रहायला होता. त्याच्यावर पोलिसात विविध गुन्हे नोंद असल्याचे माहिती मिळत आहे.