छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दुसरीकडे, परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी होण्याची साद मनोज जरांगे-पाटील यांना परिवर्तनच्या नेत्यांनी घातली आहे. असे चित्र राज्यात असताना निवडणुकीबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. अनेक नेते भेटायला येतात त्यांना थांबवू शकत नाही. मात्र कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीराजे, आमदार बच्चू कडू, राजू शेट्टी, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे आदी नेत्यांच्या उपस्थितीत परिवर्तन महाशक्तीचा मेळावा नुकताच संभाजीनगरात पार पडला. यावेळी परिवर्तनच्या नेत्यांनी जरांगे यांना महाशक्तीमध्ये येण्याची साद घातली होती. त्यानंतर जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.