बीड: जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. लोकांच्या दबावामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि सरकारला झुकावे लागले. आता या प्रकरणात सात आरोपींवर मकोका लागला आहे. तरीही तपासावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. वाल्मिक कराड याला याप्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी गोटातील आमदारांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. या पार्श्वभूमीवर आज मस्साजोगमध्ये ग्रामस्थांची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज ग्रामस्थांची बैठक होत आहे.
कृष्णा आंधळे अद्याप फरार,अटकेसाठी ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 33 दिवस पूर्ण होत आहेत. यातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन देखील केले होते. मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते.
वाल्मिक कराडला अभय मिळत असल्याची ग्रामस्थांमध्ये भावना
आता पुन्हा एकदा आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज दुपारी 12 वाजता मस्साजोग येथे ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. पोलीस अधिक्षकांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आज होणार्या बैठकीत काय निर्णय होतो हे समोर येणार आहे. दरम्यान वाल्मिक कराडला अभय मिळत असल्याची भावना पण तीव्र होत असल्याने आता बैठकीत काय दिशा ठरेल हे पाहणे गरजेचे आहे.
तोपर्यंत वाल्मिकवर मकोका लावण्यात येणार नाही
वाल्मीक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखी वागणूक त्याला दिली जात आहे. असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. वाल्मीक कराड यांचं सगळ्यांबरोबर अगदी चांगले संबंध आहेत. त्याच्यावर धनंजय मुंडे आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप दमानिया यांनी काल केला होता . जोपर्यंत दबाव आहे, तोपर्यंत वाल्मिकवर मकोका लावण्यात येणार नाही असा आरोप त्यांनी केला. वाल्मीक कराडला वाचवण्यात का येत आहे? असा सवाल विरोधक विचारत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची आजची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.