छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर जिल्ह्यातून सोडण्यात आलेले पाणी हे जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहचलं आहे. निळवंडे धरणातून हे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी समन्यायी वाटपानुसार सोडण्यात आलं होतं. आता जायकवाडी धरणात हे पाणी दाखल झाल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नाशिकमधील धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे जायकवाडीत मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी पोहचणार आहे.
बऱ्याच वाद आणि गोंधळानंतर जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दारणा धरणातून 100 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत हे पाणी सोडण्यात आले. त्यानंतर अहमदनगच्या निळवंडे धरणातून देखील पाणी सोडण्यात आले. या धरणातून 100 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तसेच निळवंडे आणि भंडारदरा धरणातून 3.36 टीएमसी पाणी सोडले आहे.
कुठल्या धरणातून किती पाणी
शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून 2.10, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), 0.5, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.