नीट: नीट (NEET) परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा पेपरफुटीचा घोटाळा सध्या संपूर्ण देशाला हादरवून सोडत आहे. या गंभीर प्रकरणाचे पडसाद आता लातूरसारख्या शैक्षणिक केंद्र असलेल्या शहरातही उमटू लागले असून, तिथले आरसीसी क्लास सुरु झाल्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

नीट (NEET) पेपरफुटीच्या गंभीर गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकर याच्यामुळे लातूरमधील आरसीसी (RCC) क्लासेस पुन्हा चर्चेत आले आहेत. पेपर फोडल्याचा आणि त्याआधारे क्लासमधील निवडक विद्यार्थ्यांना तो पेपर पुरवून लाखो रुपये कमवल्याचा ठपका त्याच्यावर आहे. सीबीआय (CBI) या संपूर्ण गैरप्रकाराचा कसून तपास करत आहे.

एकीकडे संपूर्ण देशात नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय (CBI) कसून तपास करत असताना, दुसरीकडे लातूरमध्ये मात्र या वादग्रस्त क्लासचे दरवाजे पुन्हा उघडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्य आरोपी जेलमध्ये असतानाही क्लासेस सुरू राहिल्याने कायद्याचा वचक राहिला आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, क्लास त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. आता लातूरमधील या घटनाक्रमामुळे स्थानिक राजकीय वातावरणही तापले आहे. आता प्रशासन या क्लासेसच्या विरोधात नक्की काय ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







