लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात वेगवेगळे वळण मिळत आहे. अशातच आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शननंतर आता महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा समोर आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूरला कार्यरत आहे. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीचे सुत आता लातूरपर्यंत पोहोचले आहे. नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावं आहेत.
वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही संबंध आहेत का? या अंगाने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हातात हे शिक्षक लागले.
लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडाचे (ता. चाकूर)रहिवासी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रुजू आहेत. तर लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूरला जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूर येथे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत होते, अशी माहिती आहे. नांदेड एटीएसनं या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर काल रात्रभर कसून चौकशी केली.
नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली
नीट पीजी परीक्षार्थींसाठी मोठी बातमी आहे. आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. आज नीट पीजी परीक्षा पार पडणार होती, मात्र आता ही परीक्षा होणार नाही. नीट परीक्षेचा मुद्दा गेल्या बऱ्याच कालावधीपासून चर्चेत आहे. नीट परीक्षेमध्ये घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नीट पीजी परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर पकडत होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शिक्षण विभागाने रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली आहे.