बीड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील एकूण 48 जागांपैकी महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. खासकरून मराठवाड्यामध्ये 8 पैकी 7 जागांवर महायुतीला पराभवाचा फटका बसला आहे. बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडेंचा देखील 6 हजार मतांनी पराभव झाला आहे. त्यानंतर, त्यांच्या पराभवाची विविध कारणे शोधली जात असून तिथे मराठा आणि वंजारी असा जातीय संघर्ष झाल्याची चर्चा आहे. तसेच महायुतीमध्ये असणाऱ्या घटक पक्षांनी देखील पंकजा मुंडे यांचे काम केले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. अशातच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने ते मान्य केल्याचे समोर आले आहे. खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीडमधील पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून ऑफिसची तोडफोड देखील करण्यात आली आहे. ‘पुणे प्राईम न्यूज; या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
लोकसभा निवडणूक काळात शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा सुरु असताना निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची, हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणी झाल्यानंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडे यांच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली आहे.
कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याची सांगत आहेत. त्यामध्ये, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचे देखील सांगत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकाकडून मोठ्या प्रमाणात कुंडलिक खांडे यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचा फोन बंद असून हा माझा आवाज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.