छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक सात वर्षीय, नऊ वर्षीय आणि अकरा वर्षीय अशा तीन मुलींना घरात सोडून वडील प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पसार झाली आहे. आईने दुसरे लग्न केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेला तीन महिने उलटले, तरी दोघांपैकी एकही जण घरी न परतल्याने मुलांना त्यांची चिंता लागली आहे. उघड्यावर पडलेल्या मुलांचे सुरवातीला तीन महिने शेजाऱ्यांनी पालनपोषण केले; मात्र आई-वडील न परतल्याने हे प्रकरण आता थेट पोलिसांत गेले आहे.
संभाजीनगर शहरात सूरज व रीना (नावे बदललेली) हे जोडपे काही महिन्यांपासून भाडेतत्त्वावर राहत होते. त्यांना तीन लहान मुली आहेत. मात्र, दोघांचेही बाहेर प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही प्रेमात आंधळे झाले होते. मुलींकडेही त्यांचे लक्ष नव्हते. रागाच्या भरात दोघेही मुलींना मारहाण करायचे. काही दिवसांनी दोघेही आपापल्या प्रेमिकांसोबत चक्क घर सोडून निघून गेले. आईने प्रियकरासोबत पळून जात दुसरा विवाह केल्याची माहिती मिळआली, तर वडील प्रेयसीसोबत राहण्यासाठी निघून गेले. या घटनेला तीन महिने उलटले. अद्याप आई-वडिलांनी आपल्या मुलांची एकदाही चौकशी केलेली नाही.
गेल्या तीन महिन्यांपासून आई-वडिलांच्या प्रतीक्षेत मुलींच्या डोळ्यांतील अश्रू क्षणभरही थांबले नाहीत. तीन महिन्यांपासून या तिन्ही चिमुकल्यांनी घरात जे अन्न होते, त्याआधारे गुजराण केली. पोटाची भूक भागविली. जेव्हा याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली तेव्हा ते देखील मुलांच्या मदतीला धावून आले. शेजाऱ्यांनी या मुलांना दोन वेळचे जेवण दिले. मात्र, हे किती दिवस चालणार, असे म्हणून शेजारच्यांनी पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला.
यावर सातारा पोलिसांनी खात्री करून हे प्रकरण बाल कल्याण समितीसमोर ठेवले. बाल कल्याण समितीने तातडीने निर्णय घेत तिन्ही मुलींना छावणीतील विध्यादीप बालगृहात पाठविले. या प्रकरणी आई-वडिलांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.