लातूर : लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘आई मला माफ कर, माझ्यावर तुम्ही भरपूर खर्च केला. मात्र माझी पोलीस भरती होईल असे वाटत नाही. मला माफ कर’ अशी चिठ्ठी लिहून पोलीस भरती होणार नसल्याच्या नैराश्यातून २३ वर्षीय तरुणाने गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. ही घटना बुधवारी (दि.१२) रोजी औसा तालुक्यातील बोरफळ याठिकाणी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे. नागनाथ उर्फ नागेश यादव (वय-२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश यादव हा घरातील परिस्थिती नाजूक असतानाही पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्याने अनेक ठिकाणी भरतीसाठी परीक्षा दिली होती. मात्र नेहमी एक किंवा दोन गुणांनी त्यांच्या पदरी अपयशच आले. शेवटी मुंबई येथे त्याने परीक्षा दिली. या परीक्षेत तो वेटिंगवर होता. त्याच्यासह दोन तीन जण वेटिंगवर असल्याने आपण भरती होणार नसल्याचे नैराश्य त्याला आले. त्यामुळे तो गेल्या कांही दिवसांपासून तणावात होता.त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
परिस्थिती हलाखीची असताना देखील कुटुंबातील लोकांनी आपल्यावर केलेला खर्च वाया जाऊन पोलीस बनण्याचे आपले स्वप्न भंगणार आहे. अशा प्रशांनी त्याला भंडावून सोडले. बुधवारी सकाळी तो आईशी असेच काही बोलला असल्याची माहिती मिळत आहे.
आईने त्याला घाबरू नकोस, नाही लागली नोकरी तर कांही फरक पडत नाही, असे म्हंटले होते. तसेच कष्ट करून आपण आपला उदरनिर्वाह करू, शेळ्या राखतोस तर अजून शेळ्या वाढवू ,त्यातून आलेल्या उत्पन्नावर जगू असा धीरही दिला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी शेळ्या घेऊन तो शेतीकडे हातात पुस्तक घेऊन गेला. चार वाजता घरी आला. पुन्हा लाईट आल्याने मोटार चालू करतो म्हणून शेताकडे गेला. त्यानंतर त्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.