छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार सतीश चव्हाण यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सध्या सतीश चव्हाण हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते आज (दि. १८) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईमधील वायबी चव्हाण सेंटरआले होते. त्यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल त्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी १५ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना देखील आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे”, असे राष्ट्रवादीने सांगितले आहे.