छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून एका अभियंत्याचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेलमध्ये बिलावरून टोळक्याचा वाद सुरू होता. त्याचवेळी जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुण अभियंत्याला हॉटेल मालक समजून टोळक्याने त्याच्या छातीत चाकू खुपसून अभियंत्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. ६) पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाल्टा फाटा येथील हॉटेल यशवंतमध्ये घडली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष राजू पेड्डी (वय -२८, रा. राजज्योत बिल्डिंग, उस्मानपुरा) असं खून करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पेड्डी हा आयटी अभियंता आहे. त्याचे बी टेक झालेले असून तो एका आयटी कंपनीत वर्क फ्रॉम होमचे काम करत होता. त्याच्या कुटुंबीयांचा रोपळेकर चौक भागात पारंपरिक दूध डेअरीचा व्यवसाय आहे. कुटुंबातील सदस्य लग्नासाठी हैदराबादला गेलेले असल्याने संतोष एकटाच घरी होता. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास संतोषला भूक लागल्याने त्याने तेथेच राहणारा कारचालक राधेश्याम अशोक गडदे (वय-२०, मूळ रा. मंठा) याला बोलावले.
दोघेही कारने जेवण करण्यासाठी बीड बायपासमार्गे झाल्टा फाट्याच्या दिशेने निघाले. त्यांना यशवंत हॉटेल सुरू असल्याचे दिसले. कार उभी करून दोघेही हॉटेलकडे निघाले. संतोष पेड्डी हॉटेलमध्ये शिरणार तेवढ्यात आतून एक टोळके गोंधळ घालत आले. संतोष हाच हॉटेलचा मालक असल्याचे समजून टोळके त्याच्यावर धावून गेले. संतोष टोळक्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, टोळक्यातील एकाने थेट संतोषच्या छातीत डाव्या बाजूला चाकू खुपसला. हा वार थेट हृदयाच्या जवळ लागल्याने संतोष जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.
वाहन चालक गडदेने संतोषला जखमी अवस्थेत तात्काळ उचलून कारने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी संतोषची अवस्था पाहून घाटीत घेऊन जाण्यास सांगितले. घाटीतील डॉक्टरांनी तपासून संतोषला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हॉटेल आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून फरार आरोपींचा शोध सुरू केला.
दरम्यान, संतोषचा खून केल्यानंतर तिन्ही मारेकरी एका कारमधून पळून गेले होते. चिकलठाणा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक धुळे आणि राठोड यांची पथके आरोपींच्या शोधात तात्काळ रवाना झाली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे कारच्या नंबरवरून पोलिसांनी आरोपींचा माग काढला. चाळीसगाव, मालेगाव येथून उपनिरीक्षक राठोड यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. तर एक जण अद्याप फरार आहे. त्याचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.