जालना : राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. बराच वेळ चालेल्या चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधील बैठक निष्फळ ठरली आहे. “नोंदी असलेल्या आणि सापडलेल्या संबंधित नातेवाईकांना व सर्व रक्तातील सगेसोयरे यांना हे प्रमाणपत्र मिळावे. रक्ताचे सगेसोयरे हा शब्द आपण गृहीत धरला होता. आमच्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावे,” या मागणीवर जरांगे पाटील हे ठाम आहेत. मात्र, सरकारला असे करता येणार नाही आणि तसा निर्णय देखील घेता येणार नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आजची ही बैठक निष्फळ ठरली आहे.
दरम्यान चर्चा झाल्यानंतर यावेळी बोलतांना गरीश महाजन म्हणाले की, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारला हे आरक्षण द्यायचं आहे. यासाठी चर्चेची दारं खुली असली तर मार्ग निघेल. सोयरा शब्दावरून जरांगे पाटील आणि सरकारची वेगवेगळी मतं आहे. राज्यातील विमल मुंदडा केसचा संदर्भ पाहता मुंदडा मुळच्या एससी होत्या. लग्नानंतर त्या मारवाडी झाल्या. त्यामुळे, ज्यांचे कुणबी दाखले आहेत ते ओबीसी आहेत. त्यांच्या रक्तातल्या नात्यातल्या लोकांना आरक्षण देणं बंधनकारक आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.
पुढे बोलतांना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, महिलेवरून तिच्या मुलांची जात ठरवली जात नाही. वडिलांच्या दाखल्यावरूनच मुलांची जात ठरवली जाते न्या. संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखालील समितीचे रात्रंदिवस काम सुरू आहे. शेवटच्या माणसाची नोंद बघेपर्यंत कार्यवाही चालूच राहणार आहे. महिना किंवा दीड महिन्यात हा प्रश्न निकाली निघणार आहे. आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. तसेच मराठा आंदोलक मुंबईकडे जाण्याची बातमी आल्याने, काळजी म्हणून पोलिसांनी त्यांना नोटीसा दिल्या आहेत. पोलिसांना थोडी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
दरम्यान याबाबत बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “समाज म्हणून मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळायला समाज कमी पडला नाही. त्यांचेच शब्द होते, तेच पाळत नाहीत. त्यांनी लिहिलेलं आहे, आम्हाला कशाला खोटं ठरवता. घोषणा मोठी झाली, घराला दरवाजा दिला, मात्र कडी कोंडा दिला नाही. 100 टक्के यामध्ये मार्ग निघेल. कायद्याच्या चौकटीत जे बसत आहे तेच आम्ही मागत आहोत. पुढील आंदोलनाचे 24 ला बघू, ते सरकारच्या हातात असल्याचं,” मनोज जरांगे पाटील म्हणाले.