Marathwada : छत्रपती संभाजीनगर : यंदाचा उन्हाळा मराठवाड्यासाठी अधिक भयानक असण्याची शक्यता आहे. कारण मराठवाड्याच्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या ४७ टक्के पाणीसाठा आहे. जो संपूर्ण वर्ष पूरवायचा आहे. त्यातही सर्वात मोठा प्रकल्प जायकवाडीत गेल्यावर्षीच्या पाणी साठ्याच्या तुलनेत ५१ टक्क्यांची तफावत आहे. याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये ९८ टक्के पाणीसाठा होता.
विशेषम्हणजे, दोन मध्यम प्रकल्प आत्ताच कोरडे पडले असून २५ मध्यम प्रकल्पात जोत्याच्या खाली पाणी आहे. गेल्यावर्षी ८ मोठे प्रकल्प १०० टक्के भरलेले होते मात्र यंदा त्यात समाधानकारक साठा नाही परिणामी उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न चिंताजनक होण्याची स्थिती अटळ आहे.मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमधील अहवालानुसार ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये २४४२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे हे प्रमाण ४७ टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच प्रकल्पांमध्ये ५०६७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता.
सहा मध्यम प्रकल्प जोत्याखाली
मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये असलेल्या ७५ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ ११ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. धाराशिव, बीड जिल्ह्यांत प्रत्येकी एक प्रकल्प कोरडा आहे. तर विभागात २० प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेलेले आहे. यामध्ये सात धाराशिव जिल्ह्यांतील, पाच बीड, जालना, लातूर प्रत्येकी तीन, छत्रपती संभाजीनगर दोन तर नांदेड जिल्ह्यातील एक प्रकल्पाचा समावेश आहे. २५ प्रकल्पात २५ टक्के, १३ टक्के जलसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
३१ लघुप्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील तब्बल १८३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ३१ प्रकल्प कोरडे झाले आहेत तर सातमध्ये पाणी जोत्याखाली आहे. १८३ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. ४९ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के तर १४९ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जलसाठा आहे.
प्रकल्पातील जलसाठा स्थिती :
प्रकल्प पाणीसाठा ( गेल्यावर्षीचा साठा )
जायकवाडी – ३९ टक्के ( १०० )
येलदरी – ५९ ( १०० )
सिद्धेश्वर – ९१ ( ९३ )
माजलगाव – ६ ( ९९ )
मांजरा – २४ ( १०० )
ऊर्ध्व पैनगंगा – ७९ ( १०० )
निम्न तेरणा – १७ ( १०० )
निम्न मनार – ६२ ( ९५ )
विष्णुपुरी – ७० ( १०० )
निम्न दुधना – २१ ( ७४ )
सीना कोळेगाव – ० ( १०० )