नांदेड : महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा भाग असलेल्या मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीसह परभणीत आज सकाळी ६ वाजता भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. अचानक आलेल्या या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नागरिक जीव मुठीत धरून घराबाहेर सैरावैरा धावू लागले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून, याची तीव्रता हिंगोली, परभणी, नांदेड या तीनही जिल्ह्यांतील गावांना जाणवली आहे. मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वांत मोठा धक्का असल्याची माहिती मिळत आहे.
सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात सकाळी ६.९ मिनीटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. परभणीत देखील सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला, तर याचवेळी हिंगोलीत देखील भूकंपचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात १९९३ नंतरचा हा सर्वांत मोठा धक्का असल्याची माहिती मिळत आहे.
भूकंपाची उत्पत्ती १० किलोमीटर खोलीवर झाली आहे. घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात विद्धंस झालेला नाही, त्यामुळे दिलासा मिळाला आहे. महत्वाची बाब म्हणजेच यापूर्वी सुद्धा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.
याबाबत माहिती देतांना एमजीएमच्या खगोलशास्त्र अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, “हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर ११ मिनिटांनी बसला. मात्र, या भूकंपाचे केंद्र ३ किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. या भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, काँक्रीटच्या घरांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत. तर, काही मातीची घर कोसळली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. भूकंपाचे धक्के जाणवले त्या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी पोहचले असून, घटनेचा आढावा घेत आहेत.