बीड : बीड शहर तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत त्यासोबतच जिल्ह्यातील प्रमुख नॅशनल हायवे वरती संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन पेटलं असून सोमवारी दिवसभर अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
बीड शहरात आणि जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात घडलेल्या आंदोलन आणि विघातक घटनेमुळे आतापासून पुढील अनिश्चित काळापर्यंत ही जमावबंदी करण्यात आली आहे. बीड शहर तसेच तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरामध्ये जमावबंदी आदेश बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशाने लागू झाले आहेत.