छ. संभाजीनगर : मराठा समाज आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका सुरु आहेत. अशीच एक बैठक आज २९ मार्चला छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी ही घटना घडली आहे. हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांनी एका वृत्तवाहिनीशी सवांद साधला यावेळी एक महिला म्हणाली, या बैठकीद्वारे सामान्य मराठा लोकांचा आवाज दाबला जात आहे. आम्ही मनोज जरांगे पाटलांबरोबर आहोत. इथे या लोकांची बैठक चालू होती. यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बैठक घ्यायला हवी होती. बैठक घेण्यावरून इथे भांडण झालं आहे.
दरम्यान, ज्यांच्यावर हल्ला झाला या कार्यकर्त्याने सांगितलं की, मराठा समाजातील काही गरजवंतांनी ही बैठक आयोजित केली होती. मला या बैठकीबाबत एक संदेश मिळाला. त्यामुळे मी इथे आलो. परंतु, काही लोक ही बैठक कोणी आयोजित केली? ही बैठक कोणी बोलावली आहे? असे प्रश्न विचारत आमच्यावर तुटून पडले, काही लोकांची इथे दडपशाही चालू आहे. आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असल्याचे कार्यकर्त्यानी सांगितले.