धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या लाठीचार्जच्या विरोधात एकत्र येत मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावरच टायर जाळले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळले.
मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेत पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मराठा समाजाने पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवरच टायर जाळत उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती.
त्यानंतर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षकांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. त्यानंतर लाठीचार्ज करणार्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली.