मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोली येथून सुरुवात होणार आहे. हिंगोलीमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळी साडेअकरा वाजता शांतता रॅलीला सुरूवात होणार आहे. शनिवारी 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही मराठा जनजागृती आणि शांतता रॅली काढणार आहेत. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्यानं घेतली जाणार आहे.
दरम्यान, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून 13 तारखेनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर मराठा समाज सहभागी होणार आहे. तसेच, विधानसभेत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे? 13 तारखेनंतर ठरवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
आज सकाळी मनोज जरांगे शांतता जनजागृती रॅलीसाठी सकाळी समर्थकांसह अंतरवलीहून हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे हिंगोली जिल्ह्यात दाखल होतील. बळसोंड येथे सकाळी साडेदहाच्या आसपास क्रेनच्या साहाय्यानं 30 फुटांच्या गुलाबाच्या फुलांच्या हरानं त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे.
त्यानंतर सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता शांतता रॅलीला सुरुवात होणार असून दुपारी 3 वाजता या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे.