जालना : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून सोमवारी ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडे या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत.
मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे हे दोन फॅक्टर त्यांच्या पराभवात निर्णायक ठरल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांना तातडीने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणले, या निर्णयाला वाईट म्हणायचं नाही किंवा चांगलं म्हणायचं काम नाही. मी स्वागत केल्याने किंवा न केल्याने त्यांना काही फरक पडणार आहे का? त्यांच्यामध्ये फरक पडणार असेल, तर आम्ही पंकजा मुंडे यांचं कौतुकच करु. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या निर्णयामुळे आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही. त्यांनी आणि त्यांच्या समाजाने काय समजून घ्यावं, हा त्यांचा प्रश्न आहे. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, आम्ही त्यावर काही नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाही. कारण आम्ही काही जातीयवादी नाही. आम्ही त्यांना निवडणुकीत पाडा असंही म्हणालो नव्हतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा आमच्या समाजावर काही परिणाम होण्याचं कारणच नाही. आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत आणि एकजुटीने राहणार आहोत. एकजुटीने आम्ही आरक्षणासाठी लढा देणार आहोत, असं मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.