जालना : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी २५ जानेवारी २०२५ पासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंगळवारी केली. मराठा समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी एकत्र येण्याचे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले.
कोणीही घरात राहू नये. अंतरवाली सराटीत येऊन आपली सामूहिक ताकद दाखवा, असे जरांगे म्हणाले. कुणबींना मराठ्यांचे ‘सगेसोयारे’ (जन्म किंवा लग्नाशी संबंधित) म्हणून मान्यता देणारी आणि ओबीसी प्रवर्गांतर्गत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारी मसुदा अधिसूचना लागू करण्याची जरांगे यांची मागणी आहे. कुणबी समाजाला आधीच ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ मिळतो.
आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत जरांगे म्हणाले, सरकारने आमचा विश्वासघात केला आहे. चालू हिवाळी अधिवेशनात जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही त्यांना सोडणार नाही. गेल्या एक वर्षापासून जरांगे या मुद्द्यावर उपोषण करत आहेत. हे उपोषण ऐच्छिक असणार असून मराठा समाजातील कोणताही सदस्य यात सहभागी होऊ शकतो. असे त्यांनी सांगितले. ज्याला सामील व्हायचे असेल त्यांचे स्वागत आहे.
मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा
मनोज जरांगें पुढे म्हणाले की, आमच्या मागणीचे पुन्हा एक निवेदन जिल्हाधकाऱ्यांमार्फत सरकारला देणार आहोत. 25 जानेवारी 2025 पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. 25 जानेवारीच्या आतमध्ये आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशाराच जरांगेंनी फडणवीस सरकारला दिला आहे.