परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यतील २८८ मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आपण राजकारणात नाही, लोकसभा निवडणुकीत कोणाला उभं केलं नाही, कोणाला पाडा हे देखील मी सांगितले नाही. पण त्याचा गैर अर्थ काढू नये. मी व समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही, आम्ही एकपण अपक्ष उमेदवार राज्यात उभा केलेला नाही. मात्र, विधानसभेसाठी सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार आहोत, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. या घोषणेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले. छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड येथील गोरी गांधारी मतदार केंद्राकडे जारंगे पाटील आले. आजारी असल्यामुळे ते रुग्णवाहिकेमधून मतदान केंद्रावर आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभेला उमेदवार दिले नाही, मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला २८८ मतदार संघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत.
आजारी असतानाही बजावला मतदानाचा हक्क
छत्रपती संभाजीनगरहून आजारी असताना देखील रुग्णवाहिकेतून मनोज जरांगे पाटील मतदान केंद्रावर दाखल होऊन मतदानाचा हक्क बजावला. परभणी मतदारसंघातील शहागडच्या गोरी गांधारी मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येकानं मतदान करण्याच आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले, शंभर टक्के मतदान करणं आवश्यक आहे. हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. यात आपण आजारी असो की काही असो, नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. दरम्यान, मराठा आंदोलक उमेदवार अपक्ष रिंगणात उतरणार की मनोज जरांगे पाटील एखाद्या पक्षाची स्थापना करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.