जालना: मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेत मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधूनच मराठा आरक्षण घेण्याबाबत ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच आता त्यांनी स्वतःवर होणारे उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला म्हणूनच त्यांना सहा महिन्यांचा वेळ दिला. प्रत्येकवेळी भावनेच्या भरात आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे. सगे सोयरे यांच्या अद्यादेशाबाबत हरकतीचा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
आम्ही सरकारला वेळ दिला आहे, संयम ठेवून आहोत, हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे. बुधवारी 12 वाजता जालन्यातील आंतरवालीमध्ये निर्णायक बैठक होणार आहे. यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. तसेच मी स्वतःवरील उपचार आता बंद करत आहे असे म्हणत त्यांनी सलाईन काढून फेकले आहे. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आजपर्यंत मुख्यमंत्री यांच्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवला आहे. आता देण्यात आलेलं आरक्षण फक्त निवडणुकीपर्यंत टिकल आणि उद्या जर ते उडाले तर बोंबलत बसायचं का?, आम्हाला त्या गोष्टीत पडायचं नाही. सरकारचे आरक्षण टिकेल की नाही माहित नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.