छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक खालावली आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांना पुन्हा सलाईन लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या हृदयाची तापासणीही करण्यात आली आहे. टूडी इको, इसीजीसह अत्याधुनिक मशीनद्वारे त्यांची तपासणी करण्यात आली आहे. काल शुक्रवारी बीड दौऱ्यापासून जरांगे यांना अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांनी तपासणी सुरु केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर काल त्यांनी डिस्चार्ज घेतला होता. त्यानंतर ते बीड जिल्ह्यातील साखरवाडी येथे गेले होते. त्यादरम्यानच्या काळात त्यांच्या कमरेला एकदम झटका बसला आणि त्यांचं दुखणं वाढलं. त्यानंतर दुपारच्यावेळी ते पुन्हा याच रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर आज त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी सुरु केली असून रुग्णालयात त्यांची ईसीजी आणि इको टूडी चाचणी करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती देताना डॉक्टर म्हणाले की, त्यांना काल डिस्चार्ज दिल्यानंतर ते त्यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळी गेले होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आज पुन्हा रुग्णलयात दाखल केलं आहे. आता पुन्हा त्यांच्या पूर्ण शरीराची तपासणी केली आहे. यामध्ये त्यांना डिहायड्रेशनचा त्रास असल्याची माहिती समोर आली असून त्यांना सध्या आरामची गरज आहे. तसेच त्यांना काही दिवस रुग्णालयात राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.