जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे, यासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मला झोपेत सलाईन लावले, मेलो तर मला सरकारच्या दारात नेऊन टाका. सलाईन लावायचं असेल तर अगोदर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता सांगा, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी घेतली आहे. जरांगे हे अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी बोलत होते.
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. मी मेलो तर सरकारच्या दारात नेऊन टाका, असेही जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे. त्यांनी गेल्या रविवारी उपोषणाला सुरुवात केली असून अन्न आणि पाणीही घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. शिवाय वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त पडत असलेला एक फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.