जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली 1 महिन्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचा मार्ग जरांगे यांनी अवलंबला आहे. 20 जुलैपासून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्ववभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, एक महिन्याचा वेळ आम्ही सरकारला दिला होता. आता, 20 जुलैला आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यावर असून ते मात्र कठोर करणार. तसेच, मराठा समाजाला गोड गोड बोलायचं हा फडणवीस साहेबांचा दुसरा डाव दिसतोय. ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे.
महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती, तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले आहेत. तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवली होती का? मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायला लावताय, असं म्हणत जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मला तर फडणवीस साहेबांचं आश्चर्यच वाटतंय : मनोज जरांगे पाटील
पुढे बोलताना म्हणाले, मला तर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आश्चर्यच वाटायला लागलय. बार बार एकच शब्द काढायचा, शरद पवारांनी काही दिलं नाही, त्यांच्याकडे मोर्चा वळवा. पण ते कुठे सत्तेत आहेत. साष्ट पिंपळगावच्या आंदोलनावेळी त्यांच्याकडेच मोर्चा होता आमचा. दोन टप्प्यात, दोन भूमिकेत वागणाऱ्या अवलादी आमच्या नाहीत. सत्तेत तुम्ही आहात, त्यांनी काय नुकसान केलं आम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्हाला पण करायचंय आहे का? असं म्हणत मनोज जरांगे यांनी हल्लाबोल चढवला.