जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १६ दिवसांपासून मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरु होते. १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी तुर्तास दोन पावले मागे घेत मराठा आंदोलनाची रणनीती नव्याने ठरवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सोमवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे. आता मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे, हे ठरवणार आहे. पुढील एक-दोन दिवस मी उपचार घेणार आहे. त्यानंतर लगेच पुढचा दौरा घोषित करेन. संचारबंदीमुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही.
त्यामुळे लोक सैरभैर झाले आहेत. मी सुखरुप आहे. मला कोणीही कुठेही नेलेले नाही. तोपर्यंत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे. बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट बंद केले आहे. त्यामुळे अफवा पसरत आहेत, त्या पसरु देऊ नका, असे मनोज जरांगे पाटी यांनी सांगितले.
मराठा बांधवांच्या विनंतीनुसार, मी आमरण उपोषण स्थगित करत आहे. त्याचे उपोषण साखळी उपोषणात करत आहे. मी आता गावागावत जाऊन मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला इतरांना भेटण्याचा मुलभूत अधिकार आहे. मी तुमच्याकडे येत आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.