जालना: मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे, या मागणीसाठी तब्बल चौथ्यांदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या ठवड्यात अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली होती. आज बुधवार हा त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने बुधवारी सकाळपासून मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु झाला होता. यानंतर अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची चिंता वाढली होती. याठिकाणी असणाऱ्या अनेक महिलांनी रडण्यास सुरुवात केली होती. तसेच आता उपोषणस्थळी आंदोलकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
खरं तर मंगळवारपासून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी खासगी डॉक्टरांचे एक पथक दाखल झाले होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी आज सकाळी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे यांनी डॉक्टरांना परत पाठवले होते. अखेर काही जवळचे सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी समजवल्यानंतर मनोज जरांगे पाटील वैद्यकीय उपचार घेण्यास तयार झाले आहेत.
त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले असून त्यांना सलाईन लावली आहे. तसेच त्यांना व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले होते. मनोज जरांगे यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळीही डॉक्टरांनी तपासली आहे. पुढील काही काळ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून राहतील.