जालना: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. प्रत्येक गावांमधून मराठा समाजाचा उमेदवार देणार असल्याची जोरदार चर्चा होती. आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठा समाजाला जिथे वाटेल की, संबंधित उमेदवार मराठा आणि कुणबी एकच आहेत हा कायदा पारित करण्यासाठी आणि आमच्या ज्या काही चार ते पाच मागण्या आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराला मराठ्यांनी मतदान करा. आपल्याला कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा आहे. कधीच न पडणारा पाडायचा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. माझा कोणालाही पाठिंबा नाही, लोकसभेमध्ये तुम्हाला ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, असं जरांगे पाटील यांनी सांगितले.
जो मराठा समाजाच्या बाजूने उभा राहील त्याला मतदान करा, बाकीचे सगळे पाडून टाका. तुमच्या आमच्या हट्टापायी आपली जात संपवायची नाही. कोणत्याही भावनेच्या आहारी जाऊन निवडणुका होत नाहीत. काही राजकीय पक्षांना आपला धसका होता म्हणून त्यांनी उमेदवार दिला नाही. उद्यापासून बघा कशा उमेदवारी जाहीर होतात, आपल्या जातीमुळे हे फुल गॅसवर होते. आपण शिक्का असा हाणायचा, ते म्हणाले पाहिजे मराठ्यांच्या नादी लागायचे नाही. तुम्ही कोणालाही मतदान करा, पण तो सग्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे. मी तर कोणालाही मतदान करणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.