जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. देवेंद्र फडणवीस हे मला विष देऊन किंवा इतर मार्गांनी मारणार असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना इशारा दिला की, मीच मुंबईत सागर बंगल्यावर येतो. परंतु, आंदोलक आणि समाजाने त्यांची समजूत काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याऐवजी बेमुदत उपोषण साखळी उपोषणात रुपांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी २७ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटले. विधानसभेच्या सभागृहात मोठा गदारोळ झाला. भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात आले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपली भूमिका सभागृहासमोर मांडली.
देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेतून टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलन चालू असताना असं काहीतरी अनावधानाने होऊ शकते. आमचं उपोषण हे बेमुदत आहे. त्यावेळी ते अनावधानाने झालेले असू शकते. मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील. मी शिव्या दिल्या असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी एवढंच सांगेन की, मी आई-बहिणीवरून बोललो असेन आणि ती गोष्ट फडणवीसांना लागली असेल तर मी त्या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. केवळ ते शब्द मागे घेतो.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द निघाले असतील तर मी ते शब्द मागे घेतो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आई बहिणीपेक्षा आम्हाला दुसरं काहीच मोठं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे लोक आहोत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन निघालो आहोत. त्यामुळे अनावधानाने कोणाच्याही आई-बहिणीवरून तोंडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी १०० टक्के ते शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.” मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथे एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.