बीड : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज पेटून उठला. आरक्षणासाठी आंदोलन सुरु असतानाच ३० व ३१ ऑक्टोबर रोजी बीडमधील आंदोलक आक्रमक झाले होते. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राहत्या घरात आणि राष्ट्रवादी भवनात देखील आग लावण्यात आली होती.
दरम्यान, बीडमधील जाळपोळ प्रकरणात संबंध नसलेल्या मराठा समाजातील तरूणांना अटक केली जात आहे. सत्तेचा गैरवापर गोरगरिब तरूणांवर करू नका. अन्यथा बीड आणि महाराष्ट्रातील समाज शांत बसणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांनी दिवाळीनिमित्त जरांगे-पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “बीडमधील जाळपोळ प्रकरणात संबंध नसलेल्या तरूणांना अटक करण्यात येत आहे. सात हजार लोकांची यादी काढल्याची माहिती मिळाली आहे. मराठ्यांच्या मुलांवर अन्याय करू नका. कितीही दबाव टाकला, खोटे गुन्हे दाखल केले तरी आंदोलन मोडीत निघणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही घाबरणार आणि खचणारही नाही,” असे जरांगे-पाटलांनी म्हटले आहे.
बीड, नांदेड, कुर्डूवाडी, परभणी, हिंगोली, लातूर येथील तरूणांना अटक केली जात आहे. त्याबाबत चिवटे यांना माहिती दिली. साखळी उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. लक्ष्य करून जातीवाद निर्माण केला जात आहे. घटनात्मक पदावर असलेल्या ओबीसी नेत्यांनी विनाकारण मराठा समाजातील तरूणांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत, असा आरोपही जरांगे-पाटलांनी केला.
अन्याय केल्यास बीड जिल्ह्यातील सर्व समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण, आमच्यावर अन्याय होत असेल, तर बीड आणि महाराष्ट्रातील समाज शांत बसणार नाही. आम्ही शांततेत आंदोलन करणार, पण आमच्यावरील अन्याय मोडीत काढू, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला.